मुंबई : महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारसोबत स्थानिक प्रशासनही महामारीशी मुकाबला करत आहे. अशा गंभीर स्थितीत समाजातील अनेक संघटना, संस्था सरकारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानेही कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ लाख रुपये दिले आहेत.
राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट गतीने फैलावली आहे. कोरोना महामारीमुळे हजारो लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. राज्य सरकार लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे शक्य ते प्रयत्न करीत आहे. जेव्हा राज्यावर अशा प्रकारचे संकट येते, तेव्हा साखर उद्योगाने सामाजिक जबाबदारीचे भान राखून राज्य सरकारची मदत केली आहे.