सोलापूर : वाहन मालकास ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून टोळी न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद होण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी ट्रॅक्टर मालक संघटनेने चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडे केली आहे. ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपयांची उचल ऊस टोळी मुकादमांनी घेतलेली आहे. मात्र, ॲडव्हान्स घेऊनही टोळी कामावर हजर न केल्यामुळे अनेक वाहन मालकांची फसवणूक झालेली आहे.
पंढरपूर तालुक्यात अनेक वाहन मालकांची फसवणूक झालेली आहे. अशा टोळी मुकादमांना आळा घालणे गरजेचे आहे. फसवणूक करणाऱ्या टोळी मुकादमांवर गुन्हा नोंद होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करून वाहन मालकांना न्याय मिळवून देऊ, असे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आश्वासन दिले. यावेळी मोहन नागटिळक, सुरेश देठे, राजाराम पाटील, सुनील पाटील, संतोष भोसले, जय देशमुख, अमोल माने, योगेश ताड, कारखान्याचे माजी संचालक, विविध पदाधिकारी, कार्यकारी संचालक झुंझार यावेळी संचालक गोरख जाधव, आसबे, कैलास कदम आदी वाहन मालक उपस्थित होते.