पुणे: भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर ३२०० रुपये प्रति टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३- २४ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ९ हजार ४६८ टन उसासाठी कारखान्याने एफआरपीनुसार २७९०.१० रुपये प्रति टन दर येत असतानाही यापूर्वी २९५० रुपये प्रति टनाप्रमाणे ३२७ कोटी २९ लाख ३० हजार रुपये एकरकमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. याशिवाय १.८३ लाख टन खोडवा उसासाठी १०० रुपये टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे.
अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, ऊस तोडणी व वाहतूक दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात १३७ रुपये प्रती टन वाढ होऊनही ३२०० रुपये प्रति टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. अंतिम हप्त्याची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करण्यात येणार आहे. भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही ही परंपरा कायम राहील, तरी गाळप हंगाम २०२४-२५ करिता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवण्याचे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.