हिंगोली : अखेर वसमत टोकाई सहकारी साखर कारखान्याने शुक्रवारी ऊस बिलापोटीचे ९ कोटी ४४ लाख रुपये बँकेत जमा केले. सोमवारपासून (२१ ऑगस्ट २०२३) शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिले जमा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कारखान्याने दोन महिन्यांचे ऊस बिल व ऊसतोडणी वाहतुकीचे २३ कोटी थकीत ठेवले होते. या थकीत रकमेवरून शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कारखान्याचे अध्यक्ष अँड. शिवाजीराव जाधव यांना गराडा घातला होता. त्यावेळी ऑगस्ट महिन्यात ७५ टक्के थकीत रक्कम देण्याचे आश्वासन टोकाई कारखाना प्रशासनाने दिले होते. त्याप्रमाणे कारखाना प्रशासनाने २८ ऑगस्ट रोजी बँकेत थकीत रकमेपोटी ९ कोटी ५५ लाख रुपये जमा केले आहेत. २१०० शेतकऱ्यांना थकीत रकमेच्या ५० टक्के रक्कम सोमवारपासून देण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम पुढच्या आठवड्यात दिली जाणार आहे.
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे गाळप हंगाम २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत ऊस देणाऱ्या २१०० शेतकऱ्यांचे १९ कोटी ऊस बिल थकीत ठेवले होते. तसेच ऊसतोड वाहतूकही थकीत होती. कारखान्याची जुलै महिन्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष अँड. शिवाजीराव जाधव यांनी त्यानंतर टोकाई कारखान्याची पहिली विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. त्यावेळी थकीत ऊस बिले आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी ‘अगोदर बील द्या, मगच सभा घ्या’, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर कारखाना प्रशासनाने हालचाली गतिमान करीत बँकेत पैसे जमा केले आहेत.