नवी दिल्ली :अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण २० जून रोजी संध्याकाळी उद्योग जगतातील प्रमुखांसोबत चर्चा करणार आहेत. ही बैठक नॉर्थ ब्लॉकमध्ये संध्याकाळी चार ते सहा या वेळेत होईल. यामध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की), कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री(सीआयआय), असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (एसोचेम) आणि पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अशा उद्योग संघटना अर्थसंकल्पाबाबत आपल्या सूचना आणि शिफारसी मांडतील.
ही बैठक सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्प पूर्व चर्चेचा भाग आहे.आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाला आकार देण्यासाठी प्रमुख घटकांकडून फिडबॅक आणि सूचना मिळविण्याचा उद्देश यामागे आहे.जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडला जाईल, अशी शक्यता आहे.अर्थमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी उद्योग संघटना १८ जून रोजी महसूल सचिव संजय मल्होत्रा याच्याशी चर्चा करतील.यामध्ये कर सुधारणा विविध उद्योगांना प्रोत्साहन, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठीचे उपाय तसेच लघू तथा मध्यम उद्योगांना (एसएमई) पाठबळ देण्याच्या धोरणांसह विविध विषयांवर चर्चा होईल.सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.निर्मला सीतारमण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.आतापर्यंत त्यांनी सलग सहा अर्थसंकल्प मांडले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीच्या नव्या कार्यकाळात पूर्ण अर्थसंकल्प मांडून त्या एक उच्चांक प्रस्थापित करतील.