नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोठी घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार आर्थिक पॅकेजची घोषणा होऊ शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हॉटेल्स, टुरिझमसह इतर उद्योगांवर विपरित परिणाम झाला आहे. अशातच या इंडस्ट्रीजशी संबंधित पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते.
याशिवाय, बँकांच्या खासगीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली जाऊ शकते. अलिकडेच कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीने दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणासंबंधीत विविध प्रशासकीय मुद्दे आणि नियमांबाबत चर्चा केली होती. मंत्रीगटासमोर निर्गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची चर्चा होऊ शकते.
अर्थ मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीती आयोगाने कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणुकीबाबत काही बँकांची नावे सुचविली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नावावर सर्वाधिक चर्चा झाली होती. २०२१ च्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या खासगीकरणाबाबत घोषणा केली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link