सांगली : जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यू्टतर्फे (व्हीएसआय) दक्षिण विभागातील सर्वोकृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा आणि ऊस विकास संवर्धनाचा प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले. खासदार शरद पवार यांच्या हस्ते व्हीएसआयच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी क्रांती कारखान्याच्या कामाचे कौतुक करत शरद लाड यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या. एकाच वेळी दोन सर्वोत्कृष्ठ पुरस्काराने सन्मानित झाल्याने कारखान्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आमदार अरुणअण्णा लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे आणि संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याने तांत्रिक आणि ऊस क्षेत्र वाढीसाठी दर्जेदार काम करून साखर उद्योगात उच्च स्थान निर्माण केले आहे. त्याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला. वैयक्तिक विभागातून कारखान्याचे चीफ केमिस्ट किरण पाटील यांना उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शीतल बिरनाळे, संचालक सुकुमार पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पवार, संग्राम जाधव, अश्विनी पाटील, अशोक विभूते, जयप्रकाश साळुंखे, अंजना सूर्यवंशी, बाळकृष्ण दिवाण, दिलीप थोरबोले, वैभव पवार, श्रीकांत आदी उपस्थित होते.