सांगली : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (व्हीएसआय) दक्षिण विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय कारखान्याला उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कारखान्याचे चिफ केमिस्ट किरण पाटील यांना वैयक्तिक पातळीवरील उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष लाड म्हणाले की, कारखान्याने ‘व्हीएसआय’च्या मार्गदर्शनानुसार हंगामनिहाय ऊस लागवड, तोडणीची काटेकोर अंमलबजावणी करत ऊस नोंदणी, तोडणी व वाहतुकीचे मोबाईल ॲपद्वारे नियोजन केले. कमी उत्पादन खर्चात साखर निर्मिती केली. साखर तयार करण्यासाठी २४.९८ किलो वॅट प्रती टन विजेचा वापर केला. बगॅसचा वापरही १६.१२ टक्के करत बचत केली. गाळप क्षमतेचा वापर वाढल्याने देखभाल दुरुस्ती खर्च मर्यादित ठेवल्याने हा उत्कृष्ठ कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.