सांगली : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याकडे २०२४-२५ साठीच्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन ३ हजार २२५ प्रमाणे पहिला हप्ता देण्यात येईल. या गळीत हंगामात आम्ही जाहीर केलेला दर जिल्ह्यातून जाहीर झालेल्या कारखान्यापैकी सर्वांत जास्त आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा) विश्वासराव नाईक कारखान्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. उपाध्यक्ष तथा माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह संचालक मंडळ व कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते. सध्या कारखान्यात दररोज सुमारे ५ हजार ५०० टन क्षमतेने गाळप होत आहे. हंगामात सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, विश्वास कारखान्याने जास्त ऊस दराची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षीपासून कारखान्यात १०५ के. एल. पी. डी. क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. सर्व यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आहे. कारखान्याची आर्थिक स्थितीही भक्कम आहे. तोडणी वाहतूक करणारी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून नोंदी प्रमाणे ऊसतोडणी केली जात आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी त्यांचा सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.