सोलापूर : कचरेवाडी (ता. मंगळवेढा) युटोपियन शुगर कारखाना मागील गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला दिपावलीसाठी ५१ रूपयांचा हप्ता देणार आहे. चालू गळीत हंगामासाठी प्रति टन २५११ रूपये पहिली उचल तर कर्मचारी वर्गास दिवाळी साठी ८.३३ टक्के बोनस देणार असल्याची माहिती चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ ऊसतोड कामगार यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.
यंदा आपुऱ्या पावसामुळे उसाची वाढ पुरेशा प्रमाणात झाली नसल्याने वजनही कमी होणार आहे. चालू गळीत हंगामासाठी जवळपास ७ हजार हेक्टरच्या नोंदी ‘युटोपियन शुगर्स’च्या शेती विभागाकडे झाल्या आहेत. कारखाना प्रशासनाने मागील वर्षीपासून गाळप क्षमतेमध्ये वाढ केल्याने प्रती दिन ५२०० मे. टन गाळप करण्यात येणार आहे. प्रारंभी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या हस्ते विधिवत मोळी पूजन करण्यात आले. यावेळी सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक तसेच कल्याण नलवडे, आप्पासाहेब घाडगे यांचे समवेत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते.