विराज शुगर उसाचा पहिला हप्ता २,८०० रुपये दर : माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील

सांगली : विराज शुगर कारखाना शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी सदैव कार्यरत आहे. आगामी गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन २,८०० रुपयांची पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी केली.

आळसंद (विटा) येथील विराज शुगर कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामास सोमवारी सुरुवात करण्यात आली. सर्वात अगोदर गाळप सुरू करणारा विराज हा कारखाना जिल्ह्यातील पहिला ठरला आहे. माजी आमदार पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.

ॲड. पाटील म्हणाले, मागील गळीत हंगामातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची पहिली उचल प्रतिटन २,६०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. उर्वरित प्रतिटन २०० रूपयांप्रमाणे दुसरी उचल येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वैभव पाटील म्हणाले, उसाचे वजन अत्याधुनिक संगणक प्रणालीद्वारे केले जाते. त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचा ऊस गाळपासाठी पाठविण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास संचालक उत्तम पाटणकर, विशाल पाटील, गोविंद भोसले, राजेंद्र माने, अशोक मोरे, साहिल देवकर, अमित भोसले, व्यवस्थापकीय संचालक संग्राम देशमुख, विजय कुलकर्णी, दीपक जांभळे, हैदर शिकलगार, नईम संदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here