‘दत्त-दालमिया’कडून पहिली उचल ३,३८४ रुपये घेणारच : राजू शेट्टी

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना उसाला प्रतिटन पहिली उचल ३,२०० रुपयांप्रमाणे देऊन शेतकऱ्यांचा तोटा करत आहे. हा दर अमान्य असून, कारखान्याने एफआरपी अधिक १०० रुपये म्हणजे ३ हजार ३८४ रुपये पहिली उचल घेतल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (5 डिसेंबर 2023) कारखाना गेटवर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.

वाघवे (ता. पन्हाळा) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप पाटील होते. शेट्टी म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांच्या पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत असताना दुसरीकडे ‘दत्त दालमिया’ प्रशासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. काही शेतकऱ्यांना हाताशी धरून चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या विरोधात पत्रक काढायला लावत आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. यासाठी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नसल्याने मंगळवारी कारखाना गेटवर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी रामराव चेचर, विक्रम पाटील, कृष्णात जमदाडे, सागर शंभूशेटे यांची भाषणे झाली. सावकार मादनाईक, युवा जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे, भीमगौंडा पाटील, दगडू पाटील, रामराव चेचर, दौलत पाटील, विक्रम पाटील, संजय सुतार, शहाजी कापसे, उदय पाटील, प्रधान पाटील, संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here