लातूर : औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने १ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीतील उसाची पहिली उचल प्रती टन २,५०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. मांजरा साखर परिवाराच्या धोरणाप्रमाणे गळीत हंगाम २०२३-२४ मधील गाळपास आलेल्या उसापोटी ही रक्कम दिली जात असल्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी सांगितले. याशिवाय, अंतिम दर हा मांजरा परिवाराच्या परंपरेप्रमाणे सर्वोत्तम राहतील, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, व्हाईस चेअरमन शाम भोसले व संचालक मंडळाने व्यक्त केला.
एक नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने २२ हजार ९७५ मे. टन ऊस गाळप केला आहे. आतापर्यंत १८ हजार १३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यापूर्वीच्या गळीत हंगामात उसाचे बिल दर दहा दिवसांनी ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेले आहे. त्यानुसारच यंदा १ ते १० नोव्हेंबरपर्यंत एकूण ९८,३४८.८३२ मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. त्या ऊसापोटी २५०० प्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे, असे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी सांगितले. चेअरमन गणपत बाजुळगे म्हणाले, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख व आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे.