लातूर : लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवारातील सात साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात, २०२३-२४ मध्ये २७ नोव्हेंबरअखेर ५,४८,८६९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मांजरा, रेणा, जागृती, विलास-१, विलास-२, मारुती महाराज, ट्वेण्टी वन शुगर या साखर कारखान्यांचा यात समावेश आहे. मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सात साखर कारखाने यशस्वी गाळप करीत आहेत.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजर साखर कारखान्याने १ लाख ९ हजार ४३० मे.टन, रेणा साखर कारखान्याने ८८,५०० मे.टन, जागृती शुगर कारखान्याने ९५,०२० मे.टन, विलास साखर युनिट १ निवळी कारखान्याने १,१३,९८० मे.टन, विलास युनिट २ कारखान्याने ९१,१७० मे. टन, ट्वेण्टी शुगरने १,१०,३०० मे. टन आणि मारुती महाराज बेलकुंड या साखर कारखान्याने गाळप केले आहे. जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने यशस्वीपणे चालू हंगामात गाळप करीत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील सदस्य असलेल्या साखर कारखान्यास ऊस द्यावा, असे आवाहन मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे. सर्व साखर कारखाने अतिशय काटेकोरपणे, पारदर्शकता ठेवून यशस्वीपणे गाळप करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.