नवी दिल्ली : बिहारमध्ये विविध भागात इथेनॉल आणि सिमेंटसह पाच मोठे कारखाने उद्घाटनासाठी तयार आहेत अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन यांनी दिली. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री हुसैन यांनी सांगितले की, देशभरातील गुंतवणूकदारांशी आमची चर्चा सुरू आहे. आणि ते राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत.
ते म्हणाले की, उद्घाटनासाठी तयार असलेल्या कारखान्यांपैकी आरा येथे ५ लाख लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्लांटचा समावेश आहे. ही देशातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट आहे. याशिवाय गोपालगंज जिल्ह्यात दोन इथेनॉल प्लांट तयार आहेत. याशिवाय ताजपूरमध्ये एक सिमेंट प्लांट, कैमुर जिल्ह्यात कापड कारखाना तयार आहे. मंत्री हुसेन म्हणाले की, बिहार राज्य उद्योगांसाठी अडचणीचे असल्याचे चित्र बदलले आहे. उद्योगांसाठीच्या गुंतवणूकीने रोजगाराच्या नव्या संधी तयार झाल्या आहेत. आम्ही खाद्य प्रक्रिया आणि कापड उद्योगातही गुंतवणूक संधी शोधत आहोत.