रेणापूर : रेणा साखर कारखान्याने सुरवातीपासून शेतकरी सभासदांना अधिक भाव देत राज्यात व आपल्या कार्यक्षेत्रात वेगळेपण जपले आहे. कारखान्याचे यंदाच्या गाळप हंगामात पाच लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखाना सर्वाधिक भाव देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली. कारखान्याच्या १९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून शुक्रवारी (ता. २२) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा आमदार धीरज देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे आदींच्या हस्ते गळीत हंगामाचा प्रारंभ झाला.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, माजी चेअरमन आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड प्रमोद जाधव आदींची उपस्थिती होती. धीरज देशमुख म्हणाले, की मांजरा साखर परिवाराचा राज्यात नावलौकिक आहे. दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच साखर कारखाने हेवा वाटेल असे कार्य करत आहे. लवकरच रेणाकडून बायो सीएनजी प्रकल्प सुरू होईल. चेअरमन सर्जेराव मोरे यांनी, कारखाना मालकीचे १० हार्वेस्टर व शेतकऱ्यांचे १८ हार्वेस्टर ऊस तोडणीसाठी सज्ज आहेत, त्यामुळे ७० टक्के उसाची हार्वेस्टरद्वारे तोडणी सुरू होईल, अशी माहिती दिली. लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उमाकांत खलंग्रे, शेषराव हाके, चंद्रचूड चव्हाण, लालासाहेब चव्हाण, सुरेश लहाने, बाळासाहेब कदम, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी, प्रभाकर केंद्रे, मकबूल वलांडीकर, हरिभाऊ गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते.