सोलापूर : जिल्ह्यात एकरी पाच ते सहा हजार रुपये देऊनही ऊस तोडण्यासाठी वेळेवर कामगार मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जरी कामगार मिळाले तरी ऊस पेटविल्याशिवाय हे कामगार ऊस तोडत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यात सध्या प्रतिटन २,८०० ते २,९०० रुपये दर मिळू लागला आहे. जास्त दर दिल्यामुळे आपला हंगाम पूर्ण होईल, अशी साखर कारखानदारांची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात ऊसतोडणी कामगार हे म्हणावे तेवढ्या संख्येने न आल्यामुळे ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले आहे.
साखर कारखान्याचा ऊस तोडणी प्रोग्राम धाब्यावर बसवून ट्रॅक्टर मालक आणि ऊसतोडणी कामगारांच्या मनाने ‘प्रोग्रॅम’ सुरू आहे. ऊस हा खडा असावा, वेलांनी वेढलेला ऊस तोडणार नाही, पाचट जास्त आहे, ऊस पेटवून तोडू, अशा अटी ऊसतोडणी कामगारांकडून लादल्या जात आहेत. याशिवाय उसाच्या फडापर्यंत जाण्यासाठी वाहनाची सोय, ट्रॅक्टर ड्रायव्हरला जेवणासह एंट्री म्हणून प्रत्येक खेपेला ३०० ते ५०० रुपये असा दर सुरू आहे. या पेटवून तोडलेल्या उसाला साखर कारखान्यांकडून प्रतिटन २०० रुपये कपात केली जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.