सांगली : इथेनॉल उत्पादन साखर उद्योगाला नफ्याकडे घेऊन जाईल. अनेकदा या उद्योगाशी संलग्न दिग्गजांनी ही बाब अधिक स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रातील सांगली येथे एका सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले की, साखर उद्योगाने आपल्या उत्पादनांत विविधता आणली पाहिजे. उद्योग आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य बनावा यासाठी इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार म्हणाले की, साखर उद्योगाने केवळ साखरेवर लक्ष देऊ नये तर इथेनॉल उत्पादनावर भर दिला पाहिजे.
इथेनॉल उत्पादनामुळे साखर कारखान्यांच्या महसुलाची समस्या खूप कमी होऊ शकते. यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदाही मिळेल. पवार म्हणाले की, केंद्र सरकारनेही इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण जाहीर केले आहे. सरकारचे हे धोरण उद्योगासाठी खूप फायदेशीर ठरेल. जर साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाकडे वळले तर ते ऊस उत्पादकांना एकरकमी पैसे देण्यास सक्षम होतील.
पवार म्हणाले की, फक्त साखर उत्पादन केल्यास एक वर्षासाठी त्याचा साठा करावा लागतो. यांदरम्यान कर्ज आणि व्याजाचा बोजा अधिक वाढतो. तर इथेनॉल विक्रीतून मिळणारे पैसे दोन महिन्यात वसुल होऊ शकतात. इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी पावले उचलली आहेत. केंद्र सराकरने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्व राज्ये सकारात्मक पावले उचलत आहेत.