छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी ठोकला शड्डू, तयारीला लागण्याचे कार्यकर्त्यांना निर्देश

पुणे : लोकसभेची निवडणूक आपण जिंकली आहे.आता विधानसभा व छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे निर्देश ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिले.तावशी (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते दौऱ्यावेळी ते बोलत होते. पवार यांनी सूचना करताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. लोकसभेप्रमाणेच विधानसभा व छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतदेखील यश मिळवू, असे आश्वासन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी शड्डू ठोकल्यामुळे राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. आठ दिवसापूर्वी नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनीही कारखाना निवडणुकीत ताकदीने उतरण्याचे संकेत दिले होते.

यावेळी पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातील मतदारांनी चांगले मताधिक्य दिल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. खासदार पवार हे इंदापूर तालुक्यातून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सणसर व तावशीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी त्यांच्या सत्काराचे नियोजन केले होते. पवार हे बारामती- बावडा रस्त्याने येणार असल्याची माहिती मिळताच सणसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास कदम, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, शंकर सोनवणे, हिंदुराव भोईटे, शिवराज निंबाळकर, यासीन सय्यद हे शरद पवार यांच्या सत्कारासाठी तावशी येथे आले. सरपंच चंद्रकांत सपकळ, युवराज सरक, राजन फराटे, संजय कांबळे, नाना राऊत, जयवंत धुमाळ, सुभाष पानसरे, बापूराव काळे, महादेव कवडे, शहाजी थोरात व ग्रामस्थांनी पवार यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here