बिजनौर : बिजनौर मधील बिलाई साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत बिलांसह इतर समस्यांची सोडवणूक न झाल्याने भारतीय किसान युनियनच्या चढूनी गटाच्या सदस्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत प्रश्नांची सोडवणूक होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी जाहीर केला. भाकियूच्या चढूनी गटाचे सदस्य ऊस अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यासाठी पोहोचले, तेव्हा तेथे जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढले आणि टाळे ठोकले. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना आंदोलनाविषयी माहिती दिली होती. भेटीची वेळ मागितली. तरीही शेतकरी आल्यावर ते गायब झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बिलाई साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना गेल्या वर्षीची ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सुनपता गावातील शेतकऱ्यांच्या ऊस खरेदी केंद्राची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. विभागात ऊसाची तोडणी अद्याप सुरू नाही. त्यामुळे गव्हाची पेरणी करण्यास उशीर होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना भेटून समस्या सोडविण्याऐवजी अधिकारी पळ काढत असल्याचा आरोप करण्यात आला. टाळे ठोकून कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष छतर सिंह, युवा जिल्हाध्यक्ष अतुल कुमार, अमित कुमार, धूम सिंह, विकस चौधरी, नीटू चौधरी, राजीव कुमार, मनोज कुमार, ऋषभ कुमार आदी उपस्थित होते.