पुणे : साखर उद्योगाला उसाच्या १७ जाती कष्टपूर्वक संशोधनातून कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीच दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. मात्र, आज श्रीमंत झालेल्या साखर उद्योगाला विद्यापीठाच्या योगदानाचा विसर पडला आहे,अशी खंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केली. पुणे कृषी महाविद्यालयात गुरुवारपासून आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘साखर व संलग्न उद्योग परिषद -२०२४’ चे उद्घाटन करताना डॉ. पाटील बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मिटकॉन, साखर आयुक्तालय व महाराष्ट्र पर्यावरण संघटनेच्या वतीने ही परिषद आयोजित केली आहे.
कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले की, विद्यापीठाच्या पाडेगाव संशोधन केंद्राने १९३२ पासून साखर उद्योगाला उसाच्या जाती दिल्या. त्यातून समृध्द झालेल्या शेतकऱ्यांनी बांधलेल्या नव्या घरांना उसाच्या जातींची नावे दिली. साखर कारखान्यांनी विद्यापीठाच्या संशोधन कार्याला विसरू नये. यावेळी पाडेगावच्या ऊस संशोधन कार्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कुलगुरूंनी खंत व्यक्त केली. देशातील ५८ टक्के ऊस क्षेत्र केवळ पाडेगावच्या जातींमुळे विस्तारले. कारखान्यांची धुराडी या ऊस जातींवर चालतात. या संशोधनाच्या जोरावर देशाचा साखर उद्योग आता २५ लाख कोटी रुपयांचा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, ‘मिटकॉन’चे कार्यकारी संचालक आनंद चलवादे, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले, विद्यापीठाचे संशोधन संचालक विठ्ठल शिर्के, सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे अध्यक्ष एन. शेषगिरी राव नारा, जकराया शुगर्सचे अध्यक्ष अॅड. बी. बी.जाधव, शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कृषी विद्यापीठांवर होणाऱ्या टीकेबद्दल कुलगुरू डॉ. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.