साखर कामगारांच्या वेतन वाढीबाबत समिती तयार करा : सहकार मंत्र्यांची साखर आयुक्तांना सूचना

पुणे : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयामध्ये बैठक घेतली. याप्रसंगी कामगार नेते, आमदार भाई जगताप, कामगार नेते सुनील शिंदे, अविनाश अधिक, राजेंद्र होनमाने, उदय भंडारी, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, कामगार आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती गठीत करण्याबाबत आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्या.

वळसे पाटील म्हणाले की, कामगारांच्या प्रश्नांबाबत साखर आयुक्तांकडून सविस्तर माहिती घेऊन पुन्हा कामगार नेत्यांच्या पुढील बैठकीत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री वळसे पाटील यांनी दिले. यावेळी कामगार नेत्यांनी साखर कामगारांच्या वेतन वाढीसंदर्भात राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती तत्काळ गठीत करून वेतनवाढीचा करार पूर्ण करावा. त्याचबरोबर साखर कामगारांचे थकीत वेतन द्यावे. ज्या साखर कारखान्यांनी त्रिपक्षीय समितीने केलेला करार व त्याप्रमाणे वेतनवाढ दिलेली नाही, अशा कारखानदारांना क्रशिंगचे लायसन देऊ नये अशा मागण्या केल्या. काही कारखान्यांनी कामगारांची देणी देण्यासाठी सरकारकडून त्याचबरोबर काही बँकांकडून कर्ज घेतले आहे. परंतु, कामगारांची देणी दिलेली नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here