पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथील समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या परिचालन नियंत्रण केंद्रात 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधा, जोडणी सुविधा आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज 10 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेची देखील सुरुवात केली.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी 200 हून अधिक ठिकाणांहून या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या लाखो लोकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, आजच्या कार्यक्रमाचा आवाका आणि आकार यांची तुलना रेल्वेच्या इतिहासातील इतर कोणत्याही कार्यक्रमाशी होऊ शकत नाही. आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी रेल्वे विभागाचे अभिनंदन देखील केले. देशभरात होत असलेले विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यांच्यामुळे विकसित भारताच्या उभारणीसाठी करण्यात येत असलेल्या विकास कार्यांचा सतत विस्तार होतो आहे. “2024 मधील 75 दिवसांमध्ये, 11 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे किंवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे तसेच 7 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प गेल्या 10 ते 12 दिवसांत सुरु करण्यात आले आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
आजचा कार्यक्रम म्हणजे विकसित भारताच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आज 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे अथवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे आणि त्यापैकी सुमारे 85,000 कोटी रुपयांचे प्रकल्प रेल्वे सेवेशी संबंधित आहेत. दहेज येथील पेट्रोनेट एलएनजीच्या 20,000 कोटी रुपये खर्चाच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाच्या कार्याची कोनशीला रचल्याचे सांगत, हा प्रकल्प देशातील हायड्रोजन उत्पादन तसेच पॉलीप्रॉपिलीनची मागणी यांना चालना देईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील एकता मॉल्सच्या पायाभरणीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की हा उपक्रम भारतातील कुटिरोद्योग तसेच हस्तकलेला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल आणि त्यायोगे सरकारच्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेला अधिक बळ मिळेल आणि विकसित भारताचा पाया बळकट होईल. भारतातील युवा लोकसंख्येच्या प्रमाणाचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी देशभरातील युवा वर्गाला सांगितले की, आज ज्या प्रकल्पांची उद्घाटने झाली आहेत ती त्यांच्या वर्तमानकाळासाठी उपयुक्त आहेत तर आज ज्या कार्याची पायाभरणी झाली आहे ती कार्ये त्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देणारी आहेत.
(Source: PIB)