कादवा कारखान्याचे साडेचार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन श्रीराम शेटे

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणीचे नियोजन केले आहे. कारखान्याचे कमी दिवसात जास्त गाळप होणे अत्यावश्यक आहे. अजून एक हजार में.टन गाळप क्षमता वाढविण्याचा विचार आहे. मात्र, कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध झाल्यास त्याबाबत पुढील हंगामात विचार केला जाईल. यंदा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ६,८०३ हेक्टर उसाची नोंद झाली असून, सुमारे चार ते साडेचार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. कारखान्याच्या ४८ वा गळीत हंगाम गव्हाण पूजन समारंभात ते बोलत होते.

चेअरमन शेटे, व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, संचालक, सभासद व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून हंगामाचे गव्हाण पूजन करण्यात आले. चेअरमन शेटे म्हणाले की, इथेनॉल प्रकल्पातून बी हेव्ही मोलॅसेसपासून इथेनॉल निर्मिती पूर्ण क्षमतेने केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढविण्याची गरज आहे. दत्तात्रय पाटील, माजी संचालक संजय पडोळ, विलास कड, जयराम डोखळे, शाम हिरे, सरपंच वसंत कावळे, कामगार युनियन अध्यक्ष भगवान जाधव, बाळासाहेब नाठे, विठ्ठलराव अपसुंदे, बापू पाटील यांची भाषणे झाली. यावेळी सभासद अशोक गटकळ, भाऊसाहेब देशमुख, छगन पाटील, दशरथ मालसाणे, तुकाराम वाळके, अनिल कोंड, बाळासाहेब गोजरे, बाळासाहेब पाटील, डॉ. अनिल पवार, बाजीराव क्षिरसागर, बापूराव शिंदे, पुरोहित रवींद्र जोशी यांनी सपत्नीक पूजन केले. संचालक शहाजी सोमवंशी यांनी स्वागत केले. सुखदेव जाधव यांनी आभार मानले. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here