कोल्हापूर : वारणा सहकारी साखर कारखान्याला कारखान्याला ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अडवून नुकसान केल्याप्रकरणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ऊस दराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही साखर कारखानदारांनी कारखाने सुरू करून ऊस तोडी सुरू केल्या होत्या. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध करत आंदोलन केले होते. तळसंदेजवळ झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली.
मागील वर्षीचे ऊसाचे चारशे रुपये आणि चालू वर्षीच्या गळीत हंगामाला साडेतीन हजार रुपयाची पहिली उचल द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे. दोन दिवसांपूर्वी सावर्डे (ता. हातकणंगले) येथून धनाजी शिंदे यांचा ऊस तोडणी करून वारणा कारखान्याकडे निघाला होता.
अज्ञात व्यक्तींनी हा ट्रॅक्टर मध्यरात्री बाराच्या सुमारास तळसंदेजवळ अडवला. आंदोलन सुरू असताना ऊस वाहतूक का करतोस, असे विचारत ट्रॅक्टरचा चालक अतुल आंबटवाड (रा.आलेगाव, ता. कंधार, जि. नांदेड) यांच्याकडून ट्रॅक्टरच्या चाव्या व मोबाईल काढून घेण्यात आला. दगडफेक करत ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडण्यात आले. चालकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. टायरही जाळण्यात आले. याबाबत फिर्याद दाखल होताच अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव शंकर कांबळे, संपत दत्तू पवार, हरी गणपती जाधव, सुनील गोविंद सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.