कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत जून महिन्यात नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाला होता. यंदा सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनुक्रमे १३६.३ टक्के आणि १०९.९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा १३५.२ मिमी पाऊस झाला आहे. तो नियमित पावसाच्या १३१.९ टक्के आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात १४२ टक्के सामान्य पाऊस झाला होता. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात जून महिन्यात ३९८.७ मिमी, साताऱ्यात २६४.५ मिमी, सांगलीमध्ये २०२.७ मिमी आणि सोलापूर जिल्ह्यात १३५.२ मिमी पाऊस झाला आहे. दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर गतीने पुढे सरकला. ही गती वार्षिक अपेक्षित गतीपेक्षा अधिक होती असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हवामान तज्ज्ञ शंतनू पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात चांगली झाली. आतापर्यंत सोळा जिल्ह्यात जादा पाऊस झाला आहे. तर ११ जिल्ह्यात नियमित पाऊस झाला आहे. दोन जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस झाला आहे.