पुणे : राज्यात यंदा सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या पहिल्या दहा कारखान्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती ॲग्रो, दौंड शुगर, सोमेश्वर आणि माळेगाव असे चार कारखाने आहेत. मात्र साखर उताऱ्यात अपेक्षेप्रमाणे दालमिया, कुंभी-कासारी, राजारामबापू अशा कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील कारखान्यांनी बाजी मारली आहे. याशिवाय, राज्यातील अवघ्या २० कारखान्यांनी तब्बल २६८ लाख टन म्हणजेच तब्बल पंचवीस टक्के उसाचे गाळप केले असल्याची विशेष बाब दिसून आली आहे. हंगामात सहभागी २०७ कारखान्यांनी आतापर्यंत १,०५५ लाख टन उसाचे गाळप केले आहे.
एकूण ऊस गाळपापैकी २५ टक्के ऊस फक्त २० कारखान्यांनी गाळप केला आहे. अन्य १८७ कारखान्यांनी ७५ टक्के गाळप केले आहे. यात बारामती अॅग्रोने सर्वाधिक एकवीस लाख टन तर जरंडेश्वर, दौंड शुगर या खासगी कारखान्यांनी प्रत्येकी १८ लाख टन उसाचा टप्पा ओलांडला आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने साडेअठरा लाख टनाचा टप्पा ओलांडला आहे. कमी गाळप क्षमता असतानाही पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याने सातवे तर माळेगाव कारखान्याने नववे स्थान पटकावले. सोमेश्वर साखर उताऱ्यात पहिल्या वीस कारखान्यांमध्ये आहे. साखर उताऱ्यात पहिल्या वीस क्रमांकापैकी सोमेश्वर व कादवा कारखाने वगळता इतर कोल्हापूर, सातारा, सांगली पट्ट्यातील आहेत. दालमिया शुगरने सर्वाधिक तेरा टक्के उतारा मिळवला आहे. तर कुंभी-कासारी, राजारामबापू आणि कुंभी कासारी हे कारखाने त्यापाठोपाठ आहेत.