सांगली : साखर कारखान्याला ऊस तोडणी कामगार पुरवतो, असे सांगून एका वाहन मालकाची सात लाख बेचाळीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात दगडू भावलाल भिल्ल (रा. विसखेडा, जि. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शामराव गोसावी (वय ५०, रा. अंकलखोप, ता. पलूस) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, गोसावी यांचा कारखान्याला ऊस पुरवण्याचा व्यवसाय आहे. ते ऊस तोडणी मजूर घेऊन हा व्यवसाय करतात. यादरम्यान, दगडू भिल्ल याने जिल्ह्यातील एका कारखान्याला ऊस तोडणीकरिता कामगार पुरवतो असे सांगून आगाऊ पैसे घेतले. गोसावी यांनी भिल्ल यांना तब्बल सात लाख रुपये दिले आहेत. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी गोसावी कामगार आणण्यासाठी गेले असता त्याने कामगार देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर गोसावी यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, अंकलखोप परिसरात चालू गळीत हंगामात ११ टोळ्या आलेल्या नाहीत. याबाबत ट्रॅक्टर व्यावसायिकांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या हंगामात २३ टोळ्यांच्या नावावर अडीच कोटींची फसवणूक झाली होती. त्यामुळे ट्रॅक्टरधारक हवालदिल झाले आहेत. याबाबत कारखाना आणि सरकारने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत तपास करीत आहेत.