सोलापूर : वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस तोडणी मजुरांसाठी मोफत क्षयरोग व सर्वरोग निदान, औषधोपचार शिबिर झाले. कारखान्याच्यावतीने रोपळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गुरसाळे आरोग्य उपकेंद्र यांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. संचालक कालिदास पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांच्यासह खाते प्रमुख, संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे कामगार तसेच परिसरातील ऊस तोडणी मजुरांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये क्षयरोग, रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी, अस्थिरोग, स्त्रीरोग अशा विविध आरोग्य तपासण्यात करण्यात आल्या. मोफत औषधोपचार करण्यात आले. या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी कसबे, डॉ. सचिन गुटाळ, डॉ. स्वरूप साळुंखे, डॉ. सचिन देवकते, डॉ. अनिरुद्ध नाईकनवरे, आरोग्य सेवक के. एस. इंगळे, आर. पी. वाडकर, अनिल माने, गंगाधर बगले आदींनी परिश्रम घेतले. आता पुन्हा १७ जानेवारी रोजी कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.