पॅरिस : बीट उत्पादक समुह CGB चे महासंचालक निकोलस रियालँड यांनी सांगितले की, कीटकनाशकांवरील निर्बंधांमुळे फ्रान्समधील बीट पिकाचे क्षेत्र यावर्षीच्या उच्च किमतीनंतरही १४ वर्षांतील निच्चांकी स्तरावर पोहोचेल अशी शक्यता आहे. रियालँड यांनी पॅरिस फार्म शोमध्ये रॉयटर्सला सांगितले की, बियाणे खरेदीच्या आधारावर शेतकऱ्यांकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये ६ ते ७ टक्के कमी पेरणी केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार असे दिसून येते की सहा टक्के घसरणीसह बीटसाठी लागवड केलेले क्षेत्र २००९ नंतर सर्वात कमी, ३,७८,००० हेक्टरपर्यंत जाईल. त्याचा बहुतांश वापर साखर आणि इथेनॉल उत्पादनासाठी केला जातो. २०२२ मध्ये पिकाचे क्षेत्र ४,०२,००० हेक्टर होते. फ्रान्समधील शेतकऱ्यांना अलिकडील वर्षांमध्ये खराब पिकाचा सामना करावा लागला आहे. आणि गंभीर दुष्काळाने २०२२ मधील पिक गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी कमी झाले. दोन वर्षांपूर्वी कावीळसदृश्य रोग आणि उन्हामुळे यामध्ये जवळपास ३० टक्के घसरण झाली होती. रिआलँड यांनी सांगितले की, ३०,००० हेक्टरमधील नुकसानीचा उत्पादनावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे.