पुणे / कोल्हापूर : साखर आयुक्त कार्यालयाकडे राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची २३४९ कोटी रूपयाची एफ.आर.पी. थकित असल्याची चुकीची आकडेवारी आहे. राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास ७ हजार कोटी रुपयाची एफआरपी थकित आहे. यामुळे संबंधित साखर कारखान्यांवर आर.आर.सी. अंतर्गत कारवाई करून तातडीने उसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली. येत्या आठ दिवसात साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित ७हजार कोटी रुपये १५ टक्के व्याजासह देण्यासंदर्भात साखर कारखान्यांवर आर.आर.सी. अंतर्गत कार्यवाही न केल्यास साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याबाबत गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील थकीत एफआरपीबाबत राजू शेट्टी यांनी मंगळवारी पुणे येथे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी थकित एफआरपी बरोबरच काटामारी, रिकव्हरी चोरी, वजन काटे ऑनलाईन करणे, तोडणी वाहतूकीचा खर्च अंतरावर निर्देशात करण्यात यावा, थकीत टक्के एफ.आर.पी. १५ व्याजासह वसूल करण्यात यावे, राज्यातील साखर कारखान्यांचे शासकीय लेखा परिक्षकाकडून लेखा परिक्षण करण्यात यावे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. वास्तिवक उसाचे क्षेत्र मर्यादित असल्याने अंतराची अट टाकून नवीन साखर कारखान्यांना शासनाकडून मान्यता देणे बंद आहे. मात्र दुसरीकडे तीन हजार व पाच हजार गाळप असणारे कारखाने सध्या १८ ते २० हजार टनांनी गाळप क्षमता वाढवून गाळप सुरू केले आहेत. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, अॅड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.