कोल्हापूर, दि. 28 जुलै 2018 : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफ.आर.पीच्या पायाभूत उताऱ्यामध्ये “बेस’ बदलल्यामुळे प्रतिटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा बेस पकडण्याऐवजी 9.5 बेस पकडूनच एफआरपी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय कामगार पक्षाच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. जेष्ठनेते संपतराव पवार-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, दहा बेस पकडून प्रतिटन 2 हजार 750 रुपये दर होतो. 11 रिकव्हरी झाल्यास यामध्ये 289 रुपये तर 11.5 झाल्यास 145 रुपये होणार असून एकूण प्रतिटन दर 3 हजार 184 रुपये दर होतो. हाच दर 9.5 प्रमाणे धरल्यास 2 हजार 750 व 10.5 रिकव्हरी झाल्यास 289 रुपये तसेच 11.5 रिकव्हरील उसाला प्रतिटन 3 हजार 328 रुपये मिळतात. मात्र, यामध्ये सरकारन मखलाशी केली असून शेतकऱ्यांचा तोटा केला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे 9.5 बेस पकडूणच दर जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यासह एफआरपीची रक्कम चौदा दिवसात दिलेली नाही, त्या सर्व साखर कारखान्यांनी 12 टक्केप्रमाणे व्याज दर दिलाच पाहिजे, अशीही मागणी केली आहे. यावेळी, संपतराव पवार -पाटील, भारत पाटील, कुमार जाधव, बाबुराव कदम, बाबासाहेब देवकर, अंबाजी पाटील, एकनाथ पाटील, एम. डी. निचिते उपस्थित होते.