कोल्हापूर : कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत गाळपास आलेल्या उसाला ‘एफआरपी’ची एकूण रक्कम २७ कोटी १७ लाख व तोडणी वाहतुकीची बिले शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केली आहेत. कारखान्याने प्रती टन ३, २५० रुपये दर दिला असून शेतकऱ्यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून बिले घ्यावीत, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केले आहे.
चेअरमन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याने आतापर्यंत ५,४५,०८० टनांचे गाळप केले आहे. एक जानेवारीपासून १५ जानेवारीपर्यंत गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम २७ कोटी १७ लाख रुपये होते. आजअखेर रसापासून २४ लाख ४० हजार लिटर्स इथेनॉल निर्मिती केली असून, २२ लाख ३१ हजार लिटर्स पुरवठा झाला आहे. बी हेवी इथेनॉलनिर्मिती ३७ लाख ५७ हजार लिटर्स केली असून, ९ लाख ५२ हजार लिटर्स पुरवठा झाला आहे. साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पामध्ये या हंगामात आतापर्यंत एकूण ४,९७,२३,५४० युनिटस् वीज तयार झाली आहे. त्यापैकी ३,०४,८७,५०० युनिटस् वीज निर्यात केली आहे.