कारखान्यांचे एफआरपीचे अहवाल खोटे; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

पुणे चीनी मंडी

महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना साखर कारखान्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गेल्या हंगामातील एफआरपीचे खोटे अहवाल सादर केले आहेत. त्यात शेतकऱ्यांचे सगळे पैसे दिल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडलेले नाहीत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

संघटनेचे प्रमुख आणि खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांची भेट घेतली आणि २०१७-१८च्या एफआरपीच्या पैशांचा तपशील मागितला. त्यावेळी एफआरपीच्या मुद्द्यावर भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि राजू शेट्टी यांच्यात एफआरपीच्या मुद्द्यावरून वादावादी झाली.

याबाबत राजू शेट्टी म्हणाले, अहमदनगर आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना अनेक शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील उसाची बिले अजूनही मिळाली नसल्याची तक्रार केली आहे. काही कारखान्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची बिले दिलेली नाहीत. शेतकरी आता त्याविषयी बोलू लागले आहेत.

शेट्टी यांनी या बैठकीतूनच भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फोन लावला. त्यात संभाषणात दोघांमध्ये वादावादी झाली. कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे थकवल्याचा आरोप खासदार शेट्टी यांनी केला. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना भैरवनाथ कारखान्याच्या विरोधात उभी राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे म्हणाले, आम्ही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे मिळाले आणि किती शेतकऱ्यांची गेल्या हंगामातील अजूनही थकबाकी कायम आहे, याची सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. भैरवनाथ साखर कारखान्यांचा एफआरपीचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here