कोलकाता : शिवानी राय
भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानस प्राधिकरण अर्थात दी फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस अथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) या संस्थेने फास्ट मुविंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) संदर्भात लागू केलेली नवी नियमावली साखर उत्पादकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. ‘एफएसएसएआय’ संस्थेने लागू केलेल्या नव्या नियमानुसार ज्या अन्न पदार्थांमध्ये जास्त फॅट्स, साखर आणि मिठाचा अंश आहे. त्या पदार्थांच्या पॅकिंगवर पुढच्या बाजूलाच ‘लाल’ रंग बंधनकारक असणार आहे. हा नियम लागू झाला तर, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ७० ते ७५ टक्के फूड पॅकेट्सलाही लाल रंगाचे चिन्ह द्यावे लागणार आहे.
सध्या भारतातील साखर उद्योगापुढे साखरेच्या घसरत्या किमती आणि वाढत चाललेला साठा याचे आव्हान आहे. साखरेचे अतिरिक्त सेवन आरोग्यास अपायकारक असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘एफएसएसएआय’ संस्थेने साखरेच्या पॅकेट्सवर समोरच्या बाजूला लाल रंगाचे चिन्ह द्यावे लागणार आहे. साखर उद्योगापुढे हा विषय चिंतेचा बनला आहे
कोलकाता येथे झालेल्या एस. एन. गुंडूराव स्मृती व्याख्यानात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ‘एफएसएसएआय’ संस्थेच्या नव्या नियमाचा त्यांनी उल्लेख केला. हा नियम चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात येत आहे, असे मत नाईकनवरे यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘सध्या साखर उद्योगापुढे गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत यंदाही झालेले अतिरिक्त उत्पादन चिंतेचा विषय आहे. मुळात साखरेचे अतिरिक्त सेवन अपायकारक आहे, याचा कोणताही पुरावा नाही. तसेच कोणत्याही खाद्य पदार्थाचे अतिरिक्त सेवन हे अपायकारकच असते आणि भारतासारख्या देशात साखर हा उर्जेचा सर्वांत स्वस्त स्रोत आहे. तुंम्ही साखरेला दारू, सिगारेट आणि तंबाखूच्या रांगेत बसू शकत नाही.’
साखर हा असा अन्न पदार्थ आहे की, जो रक्तात मिसळल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे त्याच्या पॅकेटवर वैधानिक इशाऱ्याची कोणतीही गरज नाही. जगभरात सध्या साखर उद्योगावर दबाव टाकला जात आहे. त्यापेक्षा सरकारने नागरिकांना त्यांच्या जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करावे, असे मत नाईकनवरे यांनी यावेळी व्यक्त केले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.