नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांनंतर इंधन दरात जोरदार वाढ झाली आहे. मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल २७ पैसे तर डिझेल २९ पैशांनी महागले. गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोलच्या दरात २.४५ रुपये तर डिझेलच्या दरात २.७८ पैशांची वाढ झाली आहे. चार मेपासून आतापर्यंत १० वेळा इंधन दरवाढ झाली आहे.
महानगरांतील इंधर दर उच्चांकी पातळीवर आहेत. मुंबईत पेट्रोल ९९.१४ रुपये तर डिझेल ९०.७१ रुपये प्रती लिटर दराने विक्री सुरू आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९२.८५ रुपये आणि डिझेल ८३.५१ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे.
केंद्र, राज्य सरकारांकडून इंधनावर आकारले जाणारे कर हे दरवाढीतील एक मुख्य कारण आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर ३५.५ टक्के तर राज्य सरकारांकडून २३ टक्के कर आकारणी केली जाते. डिझेलवर केंद्र सरकार ३८.२ टक्के तर राज्य सरकार १४.६ टक्के कर आकारणी करते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरातील बदलाचा प्रभाव पेट्रोल, डिझेलवर पडतो.
सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या. तर मंगळवारी ब्रेंट क्रूडचे दर ०.३६ टक्क्यांनी वाढून ६९.७१ प्रती बॅरल झाले. देशांतर्गत बाजारपेठेत २७ फेब्रुवारी ते ४ मे या कालावधीत तेलाच्या दरात घसरण दिसून आली होती. या काळातील नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न तेल कंपन्या करीत आहेत.