नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपुष्टा आल्याने आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर १४० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता आहे. जागतिक बाजारातील हा दर जुलै २००८ नंतरचा सर्धाधिक आहे. इंधन दरवाढीच्या शक्यतेच्या दरम्यान पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले की युपीए सरकारने इंधनाला डिरेग्यूलेट केले होते. जर तुम्ही त्यास डिरेग्यूलेट केले तर त्यामध्ये माल वाहतुकीच्या दरांचाही समावेश होतो.
याबाबत एबीपी लाइव्हवर प्रकाशित वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री म्हणाले, आम्ही इंधनाचा पुरवठा कमी होऊ देणार नाही. जगभरात काय स्थिती आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय स्थितीवर अवलंबून असतात. आम्ही नागरिकांच्या हितासाठी जो योग्य असेल असाचा निर्णय घेऊ असे सांगून हरदीप पुरी म्हणाले, निवडणुकांमुळे आम्ही इंधन दर वाढवले नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. इंधनाचे दर पेट्रोलियम कंपन्या ठरवतात. कारण त्यांना बाजारात टिकायचे असते. इंधनाच्या किमती आंतराष्ट्रीय बाजारातील स्थितीवर निश्चित केल्या जातात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही पुरी यांनी टीका केली. दरम्यान, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटमध्ये कच्चे तेल अमेरिकन बेंचमार्क रविवारी सायंकाळी १३०.५० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले होते. तोटा कमी करण्यासाठी इंधन कंपन्यांना पेट्रोल-डिझेलमध्ये प्रती लिटर १५ रुपयांची वाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.