अहिल्यानगर : श्री गणेश कारखाना इतिहासात प्रतिकूल काळात देखील उच्चांकी दर देऊन शेतकरी सभासदांचा विश्वास जपला असल्याची प्रतिक्रिया सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली. २८०० रुपये एवढा उसाचा दर आपण अदा केलेला आहे. संजीवनी, संगमनेरच्या बरोबरीने श्री गणेशला भाव देऊ हा दिलेला शब्द पाळत पुरवणी दर २०० प्रमाणे देण्याचा निर्णय पूर्वनियोजनाप्रमाणे झालेला आहे, असेही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांचे पगार आणि रिटेंशनची प्रलंबित रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. कामगारांना मिळणारे सानुग्रह अनुदान (बोनस) पूर्वी ८.३३ टक्के मिळत होता. त्यात प्रथमच गतवर्षी कारखान्याने ९ टक्के अदा केला होता. यावर्षी देखील १० टक्के बोनस अदा करणार आहे.
जुलै २०२३ मध्ये आ. बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी गणेश कारखाना ताब्यात घेतला होता. त्यापूर्वी भाडेतत्त्वावर असल्याने कारखाना आर्थिक अडचणीत होता. जुलै २०२३ पूर्वीचे तीन पगार, एक रीटेन्शन आणि फरकाची रक्कम तत्कालीन संचालक मंडळाकडून थकली होती. यातून मार्ग काढून कारखाना सुरू केला. ऊस उपलब्धता कमी व आर्थिक अडचण असल्याने २ लाख १७ हजार मेट्रिक टन गाळप होऊ शकले. यासाठी संजीवनीने सहकार्य करून मोठ्या प्रमाणात ऊस पुरविला. २ लाख ४३ हजार ८०० पोते साखर निर्मिती झाली.शेतकरी सभासद बांधवांच्या जीवनात बदल घडण्यासाठी हा कारखाना जोमाने चालविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.