नवी दिल्ली : चीनी मंडी
अन्न व पुरवठा मंत्रालयाने सप्टेंबर महिन्यासाठी २२ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरच्या कोट्यात अडीच लाख टन जादा साखर जाहीर केली आहे. बड्या कंपन्यांकडून साखरेची मागणी कमी झाल्यामुळे सध्याच्या स्थितीत साखरेच्या दरात प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.
गेल्या शनिवारी दिल्लीमध्ये साखरेचा दर ३ हजार ४५० रुपये तर उत्तर प्रदेशमधील कारखान्यात ३ हजार १५० ते ३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल होता. आता ऑगस्टच्या (१९.५ लाख टन कोटा) तुलनेत अडीच लाख टन जादा कोटा जाहीर झाला आहे. त्यानुसार विक्रीसाठी २० लाख टन कोटा आणि निर्यातीच्या बदल्यात दोन लाख टन अतिरिक्त कोट असा मिळून २२ लाख टन साखर उपलब्ध असणार आहे.
१ ऑक्टोबरपासून नवीन हंगाम
साखरेचा पुढील हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. साखर कारखान्यांकडे सध्या साखरेचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी हा साठा कमी करण्याकडे साखर कारखान्यांचा कल असणार आहे.
रेकॉर्ड ब्रेक उत्पादन
भारताच्या बाजारपठेची वर्षाची मागणी २४५ ते २५० लाख टन आहे. पण, २०१७-१८मध्ये सुरू असलेल्या हंगामात ३२२ लाख टन रेकॉर्ड उत्पादन झाले आहे. यावर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे पुढच्या हंगामातही साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारी नुसार गेल्या वर्षीच्या ४९.८६ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ५१.९४ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली आहे. त्यामुळे आगामी हंगामही बंपर उत्पादनाचा असणार आहे.