नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाच्यावतीने पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक बजेट तयार करण्याची प्रक्रिया १० ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. आर्थिक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, १० ऑक्टोबरपासून खर्च विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली बजेट पूर्व बैठका सुरू होतील. परिशिष्ट I ते VII मध्ये आवश्यक विवरण योग्य पद्धतीने नोंदविण्यात आले आहे की नाही, हे आर्थिक सल्लागारांना ठरवावे लागले. याशिवाय निर्देशीत प्रारुपांसोबत डेटाची हार्ड कॉपी पडताळणीसाठी सादर केली जाणे आवश्यक आहे.
२०२४ च्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे अखेरचे पूर्ण बजेट आहे. बजेटपूर्व बैठकांदरम्यान मंत्रालय, विविध विभागांकडील प्राप्ती आणि खर्च यांच्या सर्व श्रेणीतील गरजांची चर्चा केली जाणार आहे. अर्थ मंत्रलायातील बजेट विभागाने सांगितले की, सर्व श्रेणीतील खर्चासाठी किती निधीची गरज आहे, यासोबतच मंत्रालये, विभागांच्या उत्पन्नाबाबत बजेटपूर्व बैठकीत चर्चा केली जाईल. आर्थिक स्थितीच्या आकलनानंतर १० जानेवारी २०२३ पर्यंत अंतिम मर्यादा मंत्रालयाकडून स्वतंत्रपणे निश्चित केली जाईल. अखेरीस, २०२३-२४ चे बजेट १ फेब्रुवारी रोजी सादर होण्याची शक्यता आहे.