नवी दिल्ली येथे जी 20 प्रारूप बैठक यशस्वीरीत्या संपन्न

भारताचे जी 20 सचिवालय आणि संयुक्त राष्ट्रांचे भारतातील कार्यालय यांनी नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथे शुक्रवारी 17 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसीय जी 20 प्रारूप बैठक आयोजित केली होती.

ही बैठक म्हणजे जी 20 बैठकींना चालना देणारा पहिला अधिकृत प्रारूप G20 कार्यक्रम होता ज्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी जी 20 प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि अंतरराष्ट्रीय संस्था यांच्या भूमिकांविषयीची त्यांची मते निबंधांच्या रूपातून व्यक्त केली.

या बैठकीत दिल्ली / राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील एकूण 8 शाळा सहभागी झाल्या होत्या. एकूण, 10 जी- 20 देशांसह 12 राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 60 हून अधिक उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी बैठकीत भाग घेतला.

या बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांनी “युवावर्गासाठी लाईफ (पर्यावरण स्नेही जीवनशैली) या संकल्पनेवर आधारित मुद्द्यांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी, हवामान बदलाच्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी लाईफ अभियानाला जन चळवळीचे रूप देण्यात युवकांची जागतिक स्तरावर अपेक्षित असलेली भूमिका या पैलूवर चर्चा आणि विचारविनिमय केला.

लाईफ अभियानाच्या माध्यमातून हवामान बदल या आव्हानावर उपाय शोधण्यात युवा वर्ग बदलाचे दूत म्हणून कार्य करू शकतात ही शक्यता लक्षात घेऊन प्रारूप जी 20 कार्यक्रमासाठी ‘युवावर्गासाठी लाईफ’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती.

भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत आणि संयुक्त राष्ट्रातील भारताचे निवासी समन्वयक शॉम्बी शार्प यांनी संयुक्तपणे या बैठकीचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना कांत यांनी मिशन लाईफच्या माध्यमातून हवामान विषयक कृतीत तरुणांना महत्त्वाची भूमिका बजावता येईल यावर भर दिला. प्रारूप जी 20 बैठकीसाठी एकत्र आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पुढाकाराचे आणि हवामान बदलासारख्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यात युवा वर्गाची भूमिका या विषयावरच्या चर्चेचे त्यांनी स्वागत केले.

सहभागी विद्यार्थ्यांनी, दिवसभर केलेल्या चर्चेच्या फेऱ्यांची फलनिष्पत्ती म्हणून, “युवा-नेतृत्वातील मिशन लाईफ साठी मार्गदर्शक तत्त्वे” या शीर्षकाचा दस्तऐवज स्वीकारून बैठकीची सांगता झाली. त्यानंतर हा दस्तऐवज जी 20च्या युवा सहभाग गटाच्या (युवा 20 किंवा Y20) अध्यक्षांना त्यांच्या अधिकृत Y20 बैठकीत विचारासाठी सुपूर्द करण्यात आला.

प्रारूप जी 20 बैठकीमुळे ” शालेय विद्यार्थ्यांना वास्तविक जी 20 बैठक प्रक्रियेतील वाटाघाटी प्रक्रियेची ओळख झाली.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here