कोल्हापूर : कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा भरणा, थकीत पगार आणि रिटेन्शन अलाऊन्स न मिळाल्यामुळे साखरेची विक्री रोखण्याचा इशारा हरळी येथीलआप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या साखर कामगार संघाने दिला आहे. कारखान्याने साखर विक्रीची निविदा काढली असून, आज (शुक्रवारी) निविदा उघडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
साखर कारखान्यातील कामगारांनी यापूर्वीच भविष्य निर्वाह निधी आणि थकीत पगारासाठी कारखान्याच्या गोदामातील साखर पोती बाहेर न सोडण्याचा इशारा दिला आहे. ११ एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२३ अखेरचा कामगारांचा पगार थकीत आहे. ऑक्टोबर २०२० ते २०२३ अखेरची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कारखान्याने भरलेली नाही. हंगामी कामगारांना तीन वर्षांचा रिटेन्शन अलाऊन्स व प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळालेली नाही. जुलै २०२३ मध्ये विविध मागण्यांसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यावेळी साखर उत्पादन होऊन विक्री सुरू होईपर्यंत ६० टक्केप्रमाणे पगार ॲडव्हान्स घ्यावा. गेल्या गळीत हंगामातील साखरेची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे एप्रिल २०२४ पासून १०० टक्के पगार व मागील थकीत पगार आणि शिल्लक ४० टक्के पगार देणे आवश्यक आहे. कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, सहसचिव अरूण शेरेगार, राजेंद्र कोरे, सुनील आरबोळे, सुरेश कबुरे, सोमनाथ घेज्जी, चंद्रकांत चौगुले यांचा समावेश होता.