कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगाराच्या मागणीसाठी शंखध्वनी करून अध्यक्षांच्या दालनाला घेराव घातला. गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आपल्या कारकीर्दीतच कामगारांची सर्व देणी नक्कीच देऊ, साखर विक्रीला परवानगी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले; परंतु भाषणात गिरणी कामगारांच्या संपाचा संदर्भ दिल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यामुळे ते आपल्या दालनात गेले. त्यामुळे कामगारांनी त्यांच्या दालनाला तब्बल २ तास घेराव घातला होता.
दरम्यान, संचालक तथा कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक मेंडुले, अध्यक्ष विजय रेडेकर, उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, अरुण शेरेगार, सुनील आरबोळे आदींनी थेट त्यांच्या दालनात जाऊन जाब विचारला. शहापूरकर म्हणाले, कामगारांच्या सद्यःस्थितीला केवळ मीच जबाबदार नाही. योग्यवेळी उत्तर देईन. मात्र, साखर विक्रीतूनच कामगारांना काही देता येईल, त्यामुळे साखर अडवू नये. ३०० कोटींच्या कर्जाचे काय झाले? ५५ कोटींचा विनियोग योग्य न झाल्यामुळेच ही वेळ आली आहे, कारखाना कधी सुरू करणार आदी प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडले. दरम्यान, कारखाना व ‘ब्रिस्क’ कंपनी यांच्याकडील थकीत रकमेच्या मागणीसाठी गुरुवारी (२९) कोल्हापुरातील बिंदू चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा गोडसाखर सेवानिवृत्त कामगार, सभासद संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.