कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी अहमदाबादच्या स्वामीनारायण ट्रस्टकडून कारखान्याला ३०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवले आहे. मात्र, कर्जफेडीची वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी टाळणाऱ्या संचालक मंडळाने सभासदांना अंधारात ठेवून संगनमताने कारखाना खासगी कंपनीला चालवायला देण्याचा तसेच विक्री करण्याचा संचालकांचा डाव असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा सभासदांनी दिला आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून साखर आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले.
गडहिंग्लज साखर कारखाना सभासद कृती समितीतर्फे अमरसिंह चव्हाण व स्वाती कोरी यांनी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन दिले. बाबूराव माने, राम मजगी, बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, शिवाजी माने, अमृत शिंत्रे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सभासदांना अंधारात ठेवून ३०० कोटींचे कर्ज घेण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे; परंतु त्याच्या परतफेडीची जबाबदारी विद्यमान संचालक मंडळावर नसून केवळ कारखान्यावरच आहे. या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी तपासावी. यावेळी कारखाना स्वबळावर चालवावा, कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे वेळेवर गाळप व्हावे, उसाची बिले वेळेत मिळावीत, सेवेतील कामगारांचा पगार दरमहा मिळावा, सेवानिवृत्त कामगारांना थकीत देणी द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात बाळासाहेब मोरे, शिवाजी खोत, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, श्रीपती कदम, भीमराव पाटील, राम मजगी, शिवाजी माने, बाबूराव माने, उदय कदम, अमृत शिंत्रे, सतीश पाटील, बाळगोंडा पाटील आदींचा समावेश होता.