कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याची ऊसबिले दिलेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. उसाची बिले अदा करण्यासाठी साखर कारखान्याला तातडीने कर्जपुरवठा करावा, अशी मागणी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह ७ संचालकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे केली आहे.
याबाबत शिष्टमंडळाने जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या माघारी सात संचालकांनी दिलेल्या निवेदनामुळे कारखाना कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, अशोक मेंडुले, अक्षयकुमार पाटील यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की मार्च अखेरमुळे बँका व सेवा संस्थांकडून शेतकऱ्यांना तगादा लावला जात आहे. कारखान्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यातील उसाची बिले न दिल्यामुळे शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे. उसाची बिले अदा करण्यासाठी तातडीने कर्जपुरवठा करावा. दरम्यान, शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर संचालक सदानंद हत्तरकी यांचीही स्वाक्षरी आहे.