कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम आज, सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कमी ऊस असलेल्या उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळपाबाबत चिंता सतावत होती. बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमादिवशी अध्यक्षांनी गळीत हंगामाची तारीख जाहीर केल्याने याकडे उत्पादकांचे लक्ष केंद्रित झाले होते. कारखान्याची गाळप क्षमता कितीने वाढणार, याकडे उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या ऊस गळिताचा प्रारंभ पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून, विशेष म्हणजे स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्याण्णावर यांचीही उपस्थिती राहणार आहे. गेल्यावर्षी ‘गोडसाखर’ कारखान्याने गळीत हंगाम घेतला नव्हता. त्यापूर्वीचा एक हंगाम कमी कालावधीचा झाला होता. त्यामुळे उत्पादकांचे यंदाच्या गळिताकडे लक्ष लागून राहिले होते. ऊस दराच्या आंदोलनामुळे यंदा सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम लांबले. त्याचा काहीसा फायदा या साखर कारखान्याला होणार आहे. कारखान्याची कामे अद्याप काही प्रमाण शिल्लक असली तरी गळीत हंगाम तातडीने सुरू होत आहे. हक्काचा साखर कारखाना सुरू होणार असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.