मुंबई : चीनी मंडी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना ऊस न पिकवण्याचा सल्ला दिला होता. आता केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शेतकऱ्यांना ऊस न पिकवण्याचा सल्ला दिला आहे. साखर कारखान्यांवरील वाढता कर्जाचा बोजा आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले साखरेचे दर यांमुळे साखर उद्योग तोट्यात चालला आहे. परिणामी इथेनॉल उत्पादनाकडे जास्त लक्ष द्यावे, असे मत मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून ऊस शेतीचा खर्च वाढला आहे. मशागतीला खर्च जादा येत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांनी आता उसाऐवजी इतर पिकांचा विचार करायला हवा. साखरेच्याही उत्पादनावरील खर्च वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला चांगला दर मिळत नाही. ब्राझीलमध्ये २२ रुपये किलोने साखर विक्री सुरू आहे. आपल्याकडे सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशात ३३ ते ३४ रुपये दराने विक्री होते. त्यामुळे साखर व्यवसायच तोट्यात आहे.’ या कार्यक्रमात सहकार क्षेत्राविषयी गडकरी यांनी चिंता व्यक्त केली.
यंदा ३२४ लाख टन साखर उत्पादन
देशात यंदाच्या हंगामात (२०१८-१९) आतापर्यंत सुमारे १२१.८८ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून १०.८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात एकूण किती साखर उत्पादन होईल, याविषयी अनेक अंदाज वर्तवण्यता येत असताना यंदा ३२४ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. या वर्षी आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळपातून ५ लाख ६० हजार लाख टन साखर उत्पादन झाले आहे. पाठोपाठ कर्नाटकमध्ये २.३० लाख टन, तर सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशात आतापर्यंत केवळ १.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे.