राज्यात 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु होणार: मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: राज्यातील 2023-24 गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी (19 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुळात ही बैठक मंगळवारी (17 ऑक्टोबर) होणार होती, ती बुधवारपर्यंत (18 ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली होती. बुधवारी होणारी मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे तहकूब करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे ही सभा दुसऱ्यांदा तहकूब झाली होती. अखेर गुरुवारी दुपारी 1 वाजता बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच साखर कारखानदार महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अशी आहे राज्यातील उसाची स्थिती…

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खानदेशातही कमी पावसामुळे ऊस उत्पादनाला फटका बसला आहे. राज्यात यंदा 14 लाख 7 हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, त्यातून 1 हजार 22 लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यातील 90 टक्के ऊस गाळपास आल्यास एकूण 921 लाख टन ऊस प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. त्यातून सव्वा अकरा टक्के साखर उतारा अपेक्षित धरल्यास 103.58 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे. इथेनॉलकरिता 15 लाख टन साखर वळविल्यास व संभाव्य निव्वळ साखर उतारा दहा टक्के गृहीत धरल्यास राज्यात यंदा 88.58 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 87 हजार हेक्टर ऊस क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here