सांगली : ऊस दराबाबत गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल ठरले आहेत. गणदेवी येथील सहकार खांड उद्योग लि. या साखर कारखान्याने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला एकूण तोडणी, वाहतूक खर्च धरून ४,६७५ रुपये प्रती टन दर देण्याचे जाहीर केले आहे. प्रतीटन ७७० रुपये तोडणी, वाहतूक खर्च वजा करता ३,९०५ रुपये दर ते देणार आहेत. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील कारखान्यांनी दर द्यावा, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे.
दक्षिण गुजरात सहकारी साखर मिल असोसिएशनने सांगितले की, गणदेवी कारखान्याने केवळ ११. ४७ टक्के रिकव्हरी असताना कारखान्याने ९ लाख, १४ हजार ४९९ टन उसाचे गाळप करत १० लाख ४८ हजार ३३० क्विंटल साखर उत्पादन केले आहेत. कारखान्याने मार्च महिन्यातील उसाला ३८०५ रुपये व फेब्रुवारी महिन्यातील उसाला ३७०५ रुपये प्रती टन आणि ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंतच्या चार महिन्यांत आलेल्या ऊसाला ३६०५ रुपये टन याप्रमाणे दर देण्याचे जाहीर केले आहे. हा दर तोडणी, वाहतूक खर्च वगळून असेल. दरम्यान, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील कारखान्यांच्या व्यवस्थापनात प्रचंड आहे असे शरद जोशी शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले यांनी सांगितले.