छत्रपती संभाजीनगर : गंगापूर सहकारी साखर कारखाना चालू करण्याचे आश्वासन आम्ही सभासदांना दिले होते. अडचणींवर मात करून आम्ही जयहिंद शुगर मिल्सबरोबर करार केला. त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत कारखाना सुरू करून मागील हंगामात ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून दाखविले. पुढील गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. तर यंदा कारखाना साडेतीन लाख टन गाळप करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी दिली. कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात पार पडली.
गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी कारखाना सुरळीत सुरू करू, त्यानंतरच सत्कार स्वीकारू, असे जाहीरपणे सांगितले होते. गतवर्षी कारखाना सुरू होऊन ऊस गाळप झाले. डोणगावकर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. त्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांना फेटा बांधून त्यांचा जाहीर सत्कार केला. सभेसाठी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गावंडे, संचालक मंडळ सदस्य संजय जाधव, दिलीप बनकर, सुरेंद्र मनाळ, देवचंद राजपूत, प्रल्हाद निरपळ, तुकाराम कुंजर, दादासाहेब जगताप, प्रवीण वालतुरे, शेषराव पाटेकर, कारभारी गायके, बाबूलाल शेख, मधुकर साळुंके, शेषराव साळुंखे, मनोहर दुबिले, नामदेव दारुंटे, काशिनाथ गजहंस, रामनाथ पाटील, अण्णासाहेब शिंदे, सुभाष भोसले, मधुकर चव्हाण, बालचंद जाधव, रवींद्र पोळ, माजी संचालक अयुब पटेल, संजय गायकवाड, इसाभाई पठाण आदींसह शेतकरी उपस्थित होते. सभेत सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन आप्पासाहेब गावंडे यांनी आभार मानले.